Ad will apear here
Next
सातवीण - Alstonia scholaris (L.) R. Br.
कोकणात दिवाळीत ‘चावदिसाक’ सकाळी तुळशी वृंदावनासमोर ‘गोविंदा ss, गोविंदा sss, गोssविंदा..’ म्हणंत हिरव्या गार बुळबुळीत कारीट्याचा वध करून गोड-धोड खाण्याची इच्छा घेऊन घरात जाल तर आज्जी पेल्यात एक अत्यंत कडू करड्या रंगाचा विचित्र रस घेऊन वाटेत उभी असायची. मग या पेल्यातील एक तरी घोट घेतल्याशिवाय गत्यंतर नसायचं. “सातीवण्याच्या सालीचो रस” तो ह्योच. आणि हाच तो आजवरचा माझ्या पाहण्यातील महाकाय सातवीण वृक्ष. कुडाळ मधील हिर्लोक गावचे प्रगतशील शेतकरी, आमचे मार्गदर्शक श्री. बाजीराव झेंडे यांच्या बागेत गेली तीनशे हून अधिक वर्षे खंबीरपणे उभा आहे. त्यांनीही तो जपला आहे.

1

९ फुट व्यास आणि साधारण १२० फुट उंची. उंचीच्या बाबतीत माझा अंदाज चुकीचा ठरु नये म्हणून सोबत असलेल्या डॉ. मिलिंद वाटवे सरांकडून खातरजमा केली. अंदाज बरोबर आहे. साधारण ११० ते १२० फुटांच्या दरम्याने. विश्वास बसणार नाही पण रांगणागडावरून देखील हा वृक्ष नजरेस पडतो. Wikipedia वर सातवीण या वृक्षाची आजवर नोंदवली गेलेली सर्वाधिक उंची ४० मीटर (१३० फुट) आहे. न जाणो, व्यवस्थित मोजदात केल्यास या वृक्षाची उंची अधिक देखील भरेल. वरच्या ओथंबलेल्या मधमाश्यांच्या एक-दोन पोळ्यांकडे पाहताना टोपी मागे पडावी ! संपूर्ण झाड एका फोटोत येतच नाही. जांभ्याच्या तीनचार झाडांचे बुंधे या वृक्षाच्या मुळांमध्ये दडून गेलेत. वडाचा एक कुणीतरी चुलत भाऊबंद सुद्धा सोबत वाढतोय.

आचार्य रविद्र्नाथ टागोर यांच्या विश्व भारती विद्यापीठात त्याकाळी पदवीदान समारंभावेळी स्नातक आणि उपस्थित विद्वान मंडळीना सातवीण वृक्षाचे पान देण्याची प्रथा होती असे वाचनात आले. सातवीण वृक्षास देण्यात आलेल्या शास्त्रीय नावातील scholaris या शब्दाचा संबंध बुद्धी किंवा विद्वत्ता या शब्दाशी असावा असे वाटते. बॉटनी-टेक्झोनोमी वगैरे कुणी मंडळी सांगू शकतील. कारण रॉबर्ट ब्राऊन ने १८१० साली ह्या प्रजातीचे शास्त्रीय नामकरण केले.

या झाडाचे औषधी गुणधर्म अनेक आहेत. आयुर्वेद, होमिओपेथी, युनानी, सिद्धा या सर्व आरोग्य शास्त्रांत सातवीणचा उल्लेख आहे. स्त्रियांच्या मासिक पाळीतील काही त्रासांमध्ये या झाडाची साल भातासोबत उकडून, असा भात जेवणात काही आठवड्यांसाठी दिला जातो. शेंगा काही त्वचारोगात तसेच ‘फिट येणे’ वगैरे काही मज्जा संस्थेशी संबंधित काही अजारांत वापरतात. डायरिया, अस्थमा, कॉलरा, मलेरिया, सर्पदंश, दाढ दुखी वगैरे नानाविध आजार व रोगांवर या झाडाचे पंचांग (पंचांग म्हणजे झाडाची पाचही अंग = मूळ, खोड, पान, फुल, फळ) यांचा वापर होतो. फुलातील मकरंद मधमाशांच्या आवडीचा. अशा मधाचे विशेष औषधी गुणधर्म माझ्या पूर्वी वाचनात आले आहेत.

अशाच एका ऋषितुल्य वृक्षासोबतचे हे सुवर्ण क्षण... कोरून ठेवावेत... मनात. कसे काय एवढे अजस्त्र होत असावेत नं हे वृक्ष! सजीवच आहेत हे. उत्क्रांतीच्या शिड्यांवरून चढून जात खोल आकाशात रुतलेले आणि जमिनीतील मुळे जणू काही नाहीतच अशा थाटात पृथ्वीतलावर अचानकच प्रकट झाल्यासारखे. शेकडो वर्ष कोणती तरी अनामिक राजसत्ता सांभाळून वानप्रस्थाश्रमात प्रवेश केल्याप्रमाणे अंतिम सत्य-शांतीच्या शोधात निरव शांततेत विसावलेले, किंवा कदाचित ध्यानसाधनेत मग्न...

- मिलिंद पाटील
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OXVZCO
Similar Posts
‘भिकेडोंगरी’चो भेळो डोंगर चढायला सुरुवात झाली, गर्द झाडीतून, बांबूच्या बनातून वाट काढत आम्ही चालू लागलो. उत्सुकता शिगेला पोहोचली होती. खरंच, केवढा असेल न हा वृक्ष. भेळो, अर्थात बेहडा Terminalia bellirica (Gaertn.) Roxb. Family: Combretaceae संस्कृत मध्ये याला ‘बिभीतक’ किंवा ‘अक्ष’ असेही नाव आहे.
'साळगाव'चा हेळेश्वर कुडाळमधील साळगाव-सुतारवाडी जवळ असलेला हा बेहड्याचा महाकाय वृक्ष "कोणे एके काळी हेळेश्वर जाहला".
रोपांना आधार देताना... वृक्षांची बियांपासून केलेली रोपे झरझर वाढतात. खालील एका फोटोत आमच्या बागेत लावलेले फणसाचे एक रोप आहे जे १ वर्षात ९ फूट उंच वाढले आहे. अशा उंच रोपांना आधार देण्याची गरज असते अन्यथा मोठ्या वाऱ्यात अशी झाडे वाकडी होतात किंवा मोडतात देखील आणि अशा वाकड्या झाडांकडे दुर्लक्ष केल्यास ती तशीच वाकडी होऊन वाढू लागतात
सुरंगीचो वळेसार... लहान नाजूक पाकळ्यांची सुगंधी फुले बऱ्याचदा स्त्रीलिंगी तर काहीशी मोठी फुले पुल्लिंगी संबोधली जातात उदा. जाई, जुई, अबोली वगैरे किंवा चाफा, तगर, गुलाब वगैरे. यात अनेक अपवादही आहेत. सुरंगी अर्थात Mammea suriga (Buch.-Ham. Ex Roxb.) Kosterm. (Family: Calophyllaceae) या प्रजातीत कित्येकदा नर आणि मादी झाडे वेगळी वेगळी असतात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language